जळगाव मिरर । १२ जून २०२३
15 ते 17 जून दरम्यान मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच भारत देशातील सर्व राज्यातील व केंद्रशासीत प्रदेशातील सुमारे 4 हजार आमदारांच्या उपस्थितीत “राष्ट्रीय विधायक सम्मेलनाचे“ आयोजन एम.आय.टी. स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे तर्फे करण्यात आले आहे. नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रीय समाज निर्माण करण्यासाठी देशातील विधानसभा व विधानपरिषदेतील सुमारे 4 हजार आमदार राष्ट्रीय विधायक सम्मेलनात विचार विनिमय करणार आहेत. यामध्ये 40 समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे. राष्ट्र निर्माण, राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसुत्रीचा प्रमुख उद्देश्य ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सम्मेलनाचे उद्घाटन 16 जून रोजी भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. सम्मेलनात भारतातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे अध्यक्ष व सभापती तसेच विविध राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित आमदारांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. अधिक माहितीसाठी www.nlcbharat.org या संकेतस्थळावर भेट द्यावी. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, डॉ. मिराकुमार, डॉ. मनोहर जोशी तसेच शिवराज पाटील चाकोरकर हे या सम्मेलनाचे मुख्य संयोजक आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आहेत.

या राष्ट्रीय विधायक सम्मेलनासाठी देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील 15 सक्रीय युवकांची युवा प्रतिनिधी म्हणून समिती तर्फे निवड करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातून युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांची निवड करण्यात आली आहे. यासह मध्यप्रदेशातून शायना कुरेशी, गुजरातहून ॲङ कुणाल शर्मा, बिहारमधून शैलेशकुमार राय, दिल्लीतून अंकितकुमार, मुंबईहून मयूर मोरे, जम्मू कश्मीरमधून संजयसिंग ठाकूर भारतीय, उत्तरप्रदेशातून रोहीतकुमार ओझा आदि युवक प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.




















