जळगाव मिरर | १६ जुलै २०२४
शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी ४५ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या कंत्राटदार अजय भागवत बढे यांना सोमवारी तापी महामंडळाचे सेवानिवृत्त अभियंता तथा माजी विभागीय माहिती आयुक्त व्ही.डी. पाटील यांच्या नावाने धमकावण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या पंकज वासुदेव नेमाडेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तापी पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी आठ जणांनी ४५ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. याविषयी तक्रारदार अजय बढे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. या संशयितांमध्ये व्ही. डी पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी बढे यांच्या मोबाईलवर ‘व्ही.डी. पाटील यांना चांगले ओळखतात, तुम्ही जे केले त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील’ अशी धमकी दिली. नंतर नेमाडे याने तो मेसेज डिलिट करून टाकला. या प्रकरणी बढे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.