
जळगाव मिरर । २७ ऑक्टोबर २०२२
गेल्या चार महिन्यापासून राजकारणातील शिंदे गटावर नेहमी कडाडून टीका करणारे ठाकरे गटातील महिला नेत्या दिपाली सय्यद आता शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. पण दिवाळीच्या एका पोस्टमुळे आता वारे दुसरीकडे वाहू लागतात कि काय ? असे संकेत दिपाली सय्यद यांनी दिले आहेत.
आपल्या घरासमोर दिपाली सय्यद यांनी कमळाची रांगोळी रेखाटली आहे. त्यामुळे त्या आता शिंदे गटाऐवजी भाजपमध्ये जाणार का?, अशा चर्चा रंगल्या आहेत. इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये दिपाली सय्यद यांनी चक्क ‘कमळा’ची आकृती रेखाटल्याचे दिसत आहे. त्यासोबतच ‘दिवाळीतील दिव्यांची दीपमाळ अशाच संकल्पांनी भरलेली असावी, संकल्परूपी एक एक दीप जेव्हा माळेत सामावतो तेव्हा ती दीपमाळ तयार होते. अशाच अनेक संकल्पांनी सजलेली ही दीपमाळ जीवनातील अंध:कार संपवून प्रकाश देईल अशा शुभेच्छा’ असा मजकूर दीपाली सय्यद यांनी पोस्ट केला आहे. त्यामुळे दिपाली सय्यद राजकारणात आता नेमका कोणता दिवा हातात घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या दीपाली सय्यदही शिंदे गटात जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण ठाकरेंसोबत राहणार की नाही, असा प्रश्न दीपाली सय्यद यांना विचारताच त्यांनी ‘वेट अँड वॉच’ असे सूचक वक्तव्य केले होते. दिपाली सय्यद काही दिवसांपूर्वीच म्हणाल्या होत्या की, शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या, तरच तुम्ही राजकारणात सक्रिय आहात असा समज करण्याची गरज नाही. जी लोक कामे करतात त्यांनाच लोक पाठिंबा देतात. ‘प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे. प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल. सध्या मी शिवसेनेत आहे.’





















