
जळगाव मिरर / २२ एप्रिल २०२३ ।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सकाळ समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोठा दावा करत महाविकास आघाडीत खळबळ उडवून दिली. २०२४ची वाट कशाला बघायची? आजही मी मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो, असे मोठे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीसह सत्ताधारी नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. याच विधानावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही आज जळगावात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते फार अनुभवी नेते आहेत. उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. मात्र लायकी नसलेले काही मुख्यमंत्री झाले, अशी खोचक टीका नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आणि हाच धागा पकडून भाजप नेते मोहित कंबोज यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांच्या याच विधानासंदर्भात मोहित कम्बोज यांनी ट्वीट केले आहे. उद्धव ठाकरेंबद्दल संजय राऊत जे बोलले, ते अगदी बरोबर आहे. ते कोणत्याही पात्रतेशिवाय, तोडफोड करून मुख्यमंत्री झाले, असल्याची टीका विखारी त्यांनी केली आहे.






















