
जळगाव मिरर | १२ जून २०२४
गेल्या दीड महिन्यांपासून आजीकडे राहत असलेलया मीना सनी राठोड (वय २२, रा. धानोरा, ता. जळगाव) या विवाहितेने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही दुर्देवी घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली. विवाहितेने आत्महत्या केली नसून तीच्या पतीनेच तिच्यासोबत घातपात केल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात केला होता.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या मीना यांचे आठ महिन्यांपूर्वीच सनी राठोड याच्याशी लग्न झाले आहे. पतीकडून वारंवार छळ होत असल्याने विवाहिता दीड महिन्यांपूर्वी हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या आजीकडे आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या एका खासगी डॉक्टरकडे कामाला लागल्या होत्या. मंगळवार दि. ११ जून रोजी सकाळी मीना राठोड यांचा भाऊ त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होता. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने त्याच्या मित्राला पाहण्यासाठी पाठविले. त्या वेळी मित्र व त्याची आई विवाहिता राहत असलेल्या घरी गेले असता त्यांना मीना या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. त्या वेळी त्यांनी विवाहितेचा भाऊ व इतरांना माहिती दिली. ते तेथे पोहचले व विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषित केले.





















