मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दि ४ रोजी दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचे स्वागत केले. उद्या ५ रोजी दिवसभर अमित शहा सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या घरी जात बाप्पाचे दर्शन घेणार असून लालबागच्या राजाचेही दर्शन घेणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन,आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शहांच्या नेतृत्वात उद्या बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याह भाजपचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरगुती गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.
ठाकरेंची सत्ता उलथवण्याची रणनीती
29 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ती काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. शहांच्या मुंबई दौऱ्यानिमित्ताने मिशन मुंबईचा शुभारंभ होईल. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येत आहेत. शहा 2017 मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे. मुंबई पालिकेत 227 नगरसेवक आहेत. या वेळी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपने ‘मिशन 200’ची घोषणा केली आहे. भाजपबरोबर शिंदे गट आणि मनसेची आघाडी होण्याची शक्यता असल्याने अमित शहा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बैठक ही होणार असल्याचे समजते.