जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२४
राज्यात महायुतीला मोठे यश आल्यानंतर अनेक आमदारांनी मंत्रीपदासाठी आपापल्या नेत्यांकडे मोठी फिल्डिंग लावली होती. मात्र भाजपसह अनेक नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने अनेक नेते नाराज झाले होते, त्यात आ.रवी राणा देखील नाराज झाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी आ.रवी राणा यांना भेटीसाठी बोलविले आहे. त्यामुळे आता या दोघांच्या बैठकीमध्ये राजकीयदृष्ट्या काय खलबते सुरू आहेत? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सध्या राजकीय खलबते सुरु असल्याचे दिसून येत आहे. नाराज असलेले आमदार रवी राणा यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीसाठी बोलावले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार रवी राणा यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी रवी राणा यांना अपेक्षा होती. तशी अपेक्षा त्यांनी बोलून देखील दाखवली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये युतीतील तीन मित्र पक्ष सोडले तर एकाही सहभागी छोट्या पक्षाला मंत्रिपद मिळालेले नाही.
आमदार रवी राणा यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन म्हणून रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र तसे झाले नाही. आता नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्ष कोणती जबाबदारी देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.