मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणी जरांगेंना उपोषणासाठी आझाद मैदान अपुरे असल्याचे नमूद करत त्यांना नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदानात उपोषणाला बसण्याची सूचना केली आहे. पण त्यानंतरही जरांगे आपल्या आझाद मैदानातील मुक्कामावर ठाम असून, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आपल्या गाड्यांची तोंडे मुंबईच्या दिशेने वळवण्याचे आदेश दिलेत.
मनोज जरांगे उद्या 26 जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाची मराठा समाजाने जय्यत तयारी केली आहे. आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार ककरून आझाद मैदानाची परवानगी मागितली होती. आम्ही व्यासपीठ उभारण्याचे कामही सुरू केले आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनही याच मैदानात करू, असे मराठा आंदोलकांचे नेते वीरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.
मुंबई पोलिसांनी जरांगे यांना एका नोटीसीद्वारे आझाद मैदानात उपोषण करता येणार नाही, असे कळवले आहे. मराठा आंदोलनामुळे मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल. विशेषतः आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही. त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील, असे पोलिसांनी जरांगे यांना आपल्या नोटीसीद्वारे सूचवले आहे.