जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३
राज्यातील शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्यापूर्वीच आता कॉंग्रेसच्या आमदारांची आमदारकी रद्द झाली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेल्या कारवाईनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी अखेर रद्द झाली आहे. सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
दोन दिवसांआधी नागपूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन वर्षांपेक्षा जास्तकाळाची शिक्षा सुनावली गेली. तर त्या विधिमंडळ सदस्याला आमदारपदी राहता येत नाही. त्याच नुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हा बँकेत 2002 मध्ये झालेल्या 149 कोटींच्या होम ट्रेड घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांच्यासह इतर पाच जणांना जिल्हा न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड ठोठावला होता. त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी केदार यांना अटकही केली. नंतर लगेच रक्तदाब वाढल्याने रुग्णालयातही दाखल करण्यात आले. शिक्षा झालेल्या इतर पाच आरोपींमध्ये बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी (सर्व मुंबई) व अमित सीतापती वर्मा (अहमदाबाद) यांचा समावेश आहे. हा घोटाळा झाला त्यावेळी केदार बँकेचे अध्यक्ष होते.