जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२४
जळगांव मधील शरद पवार गट लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदारपणे कामाला लागल्याचे दिसत आहे. एका बाजूला शहरातील नेत्यांच्या मुंबईला बैठका वाढल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रदेश पदाधिकारी शहराला भेटी देत आहेत. याच पार्श्वूमीवर काल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी जिल्ह्यामध्ये येत तरुण पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी जळगांव शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, अखील चौधरी, डॉ. अभिषेक ठाकूर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, माजी नगरसेवक रिजवान शेख, राजु मोरे, इब्राहिम तडवी, अमोल कोल्हे , आत्माराम राठोड़ , मुरलीधर राठोड , भुसावळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष विवेक सपकाळे, धरणगाव तालुका विद्यार्थी अध्यक्ष वासुदेव सपकाळे, यावल तालुका विद्यार्थी अध्यक्ष प्रतीक पाटील, जामनेर तालुका विद्यार्थी अध्यक्ष विशाल पाटील, आणि इतर असंख्य तरुण पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले की, आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहोत. नवीन मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विद्यार्थी संघटना प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी आमचे पदाधिकारी संघटन, उपक्रम, आंदोलन या त्रिसूत्रीवर काम करत पक्षाचा विस्तार करणार आहेत. विद्यमान सरकार हे विद्यार्थी विरोधी सरकार आहे. एका बाजूला उत्तर भारतातील परीक्षा घोटाळ्यांचा पॅटर्न आता महाराष्ट्रात राबवला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला पाठीमागच्या दारातून कंत्राटी भरती प्रत्येक विभागात सुरू आहे. त्यातून भाजप आपल्या हिताच्या लोकांना शासकीय व्यवस्थेत सहभागी करुन घेत आहे आणि त्या माध्यमातून शासकीय यंत्रणांचा ताबा घेत आहे.
राज्यातील कंपन्या गुजरातला पळवल्या जात आहेत. संशोधक विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची आधीछात्रवृत्ती नाकारली जात आहे. शिक्षण हक्क कायदा (आर टी ई ) नुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनाकडून गेले तीन वर्ष झाले करण्यात आलेली नाही, त्यामुळे खाजगी शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहेत. दुसरीकडे मात्र सांस्कृतीक अस्मितेच्या इव्हेंटच्या आड विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे. अशी टिका प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगांव शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नवीन तरुणांनी शरद पवारांनी केलेले काम समजून घेतले पाहिजे व ते नव्या पिढीला समजावून सांगायला हवे. आगामी लोकसभा निवडणुकीत युवा पिढीवर महत्त्वाची जबाबदारी असून प्रचाराची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घ्यायला हवी. शहराध्यक्ष म्हणून नवीन पिढीला संधी देण्याची भूमिका पुढील निवडणुकांत घेतली जाईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. आगामी काळात जळगाव लोकसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध भागात आदरणी एकनाथ खडसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर संघटन उभे करून पक्षाची ताकद वाढवत लोकसभेची जागा खेचून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले