जळगाव मिरर | ३ नोव्हेबर २०२४
राज्यात राजकीय निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महायुती व महाविकास आघाडी आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठा खटाटोप सुरु असतांना नुकतेच भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी मोठे वक्तव्य केल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम विधानसभा मतदारसंघात सुरू असलेला तिढा सुटण्याची शक्यता आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे महायुतीकडून सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव निर्माण करण्यात येत आहे. यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसाद लाड म्हणाले, अमित ठाकरे आमचा मुलगा आहे. आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार. अमित ठाकरेंना आम्ही निवडून आणणार, असे प्रसाद लाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरवणकर यांना माघार घ्यावीच लागणार असे दिसत आहे. सदा सरवणकर उमेदवारी अर्ज माघार घेतील, असे आम्हाला वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समजावतील. पण आम्ही मनसेला मदत करू. मनसेने आम्हाला मदत केली आहे, त्यामुळे उद्या आम्ही चार वाजेपर्यंत वाट बघू, अशी भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली आहे.
दरम्यान, सदा सरवणकर यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अट ठेवली आहे. सदा सरवणकर म्हणाले, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीच्या विरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावेत. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.