जळगाव मिरर | ५ मार्च २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. यात ऑनलाइन पद्धतीने देहव्यापारसाठी वेबसाईट बनवून मुली आणि महिला पुरविण्याच्या नावावर लोकांना फसविण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना बुलढाणा शहरात घडली. या प्रकरणी एका तरुणाला जवळपास ६ लाख रुपयांनी फसविण्यात आले आहे.
ही बाब सदर व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्याने बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांच्या एका पथकाने ३ दिवसात जवळपास ५ हजार किलोमीटरचा प्रवास करून राजस्थानमधून ५ आरोपींना अटक केली आहे. सायबर पोलिसांचे पथक आरोपींना शोधण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात आणि चंदीगडपर्यंत पोहोचले. शेवटी आरोपी जयपूर- अंबाला रोडवरुन जात असल्याचे मोबाईल लोकेशन द्वारे कळाले. त्यानंतर पथकाने आरोपींचा आपल्या कारने पाठलाग सुरू केला.
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील कोटा जिल्ह्यातील मंडाना, राजस्थान येथे आरोपींना सिनेस्टाईल ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल आणि कार असा एकूण ७ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. हनीट्रॅपमध्ये नागरिकांना गुंतवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याच्या आजवर अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा गोष्टींमध्ये गुंतू नये. तसेच सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नागरिकांना केले आहे. मुंबईसह पुण्यातून अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. अशात आता बुलढाण्यात देखील अशी घटना घडल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचं आहे.