जळगाव मिरर | २७ जुलै २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी माजविणाऱ्या गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी पोलीस प्रशासन लागलीच कारवाई करीत ‘भाईगिरी’ करणारयांना चांगलीच अद्दल घडवीत असते. नुकतेच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांच्या गराड्यात स्वत:ला मिरवूण घेणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ध्रुवनगर परिसरातून पकडले आहे. त्याच्यासोबत कारचालकास कारसह ताब्यात घेतले आहे. हर्षद सुनील पाटणकर (२६, रा. बेथेलनगर, शरणपूर राेड) असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून कारचालक नरेश उर्फ पवन माणिक कसबे (३१, रा. यशराज प्राईड, ध्रुवनगर) यालाही पोलिसांनी पकडले आहे. तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्या ३० हून अधिक जणांची ओळख पटवली असून त्यातील ११ जणांना पकडले असून त्यांच्या दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
हर्षद पाटणकर यास गंभीर गुन्हे दाखल असल्याने तडीपार करण्यात आले होते. मात्र, तरीदेखील त्याच्यात सुधारणा न झाल्याने तत्कालीन पोलिस आयुक्तांनी हर्षदला वर्षभरासाठी मध्यवर्ती कारागृहात एम. पी. डी.ए. कायद्यानुसार स्थानबद्ध केले होते. मंगळवारी (दि.२३) स्थानबद्धतेचा कालावधी संपल्याने हर्षदची कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याचे स्वागत केले. त्यासाठी त्यांनी कारमध्ये हर्षदला बसवून दुचाकीवर १५ ते २० जणांच्या जमावाने मिरवणूक काढली. मिरवणूकीत दुचाकीस्वारांनी गोंधळ घालत हॉर्न वाजवून परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कळल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी हर्षदसह आठजणांविरोधात गुन्हा दाखल केला. संशयितांमध्ये दोन तडीपार गुंडाचाही समावेश आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी तपास करीत गोपाल नागोरकर या तडीपार गुंडास पकडले, तर वेदांत चाळगे याचा शोध सुरू आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हर्षद बेथेल नगर परिसरातून फरार झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढत त्यास ध्रुवनगर परिसरातून पकडले. पोलिसांनी हर्षदसह कारचालक कसबे यालाही पकडले. त्यांच्याकडून मिरवणुकीत वापरलेली कारही जप्त केली आहे.
संशयित हर्षद पाटणकर याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून परिसरात दहशत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. सोशल मीडियावर त्याच्यासह त्याचे समर्थक विविध स्टेटस ठेवून दहशत करत असल्याचे समोर आले आहे. न्यायालयात आणताना, पोलिस बेड्यांमधील किंवा मध्यवर्ती कारागृहात असतानाचे छायाचित्रे, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून हर्षदसह त्याचे समर्थक दहशत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले आहे.
शहर पोलिसांनी संशयितांची धरपकड करीत त्यांची वाहनेही जप्त केली आहे. तसेच सोशल मीडियावर संशयितांनी रिल्स बनवलेले असताना पोलिसांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून संशयितांचा अटक केलेला व्हिडीओ टाकून ‘नो भाऊगिरी रिल्स’ नावे टाकून ‘अ रिअल कम बॅक’ या स्लोगन खाली हर्षदसह त्याच्या समर्थकांना दणका दिला.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरवासियांनी त्यांना फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्सवरून भाईगिरी करणाऱ्या गुंडाचे ९१ व्हिडीओ पाठवून तक्रारी केल्या. त्यानुसार शहर पोलिसांनी सायबर पेट्रोलिंगद्वारे या व्हिडीओची शहानिशा करीत आवश्यकतेनुसार कारवाई देखील केली. पोलिसांच्या पाहणीत या ९१ व्हिडीओंना १ कोटी ७६ लाख ३९ हजार ८७८ लोकांनी पाहिले, १३ लाख १० हजार ५२६ जणांनी लाईक केले, तर १८ हजार ४७६ जणांनी कमेंट केल्या. तसेच व्हिडीओ शेअर करणाऱ्या खातेधारकांना ६ लाख ८२ हजार ५१० फाॅलोअर्स असल्याचेही आढळून आले.