
जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे तर नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण तसेच वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. गडचिरोलीमध्ये पोलिस अतिशय चांगले काम करत आहेत, या भागातला माओवाद्यांचा प्रभाव आपण संपवला आहे. माओवाद्यांचा प्रभाव संपवून आम्ही गडचिरोली हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा बनविण्यास सुरुवात केली आहे. आता 75 वर्षांनंतर इथल्या लोकांना एसटी बस पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आजचा दिवस खूप खास असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील या मार्गावर जवळपास 15 गावांना पहिल्यांदाच बस सेवा मिळाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बस सेवेचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी स्वतः एसटीमध्ये बसून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यातच मुख्यमंत्र्यांनी एसटीचा प्रवास केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गावकऱ्यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर पहिल्यांदाच या भागामध्ये बस सेवा सुरू झाली आहे. या माध्यमातून नक्षलवाद संपवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही तर महाराष्ट्राचा पहिला जिल्हा करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. या भागात चांगले रस्ते आणि पुल विकसित केले गेले, असल्याचा दावा त्यांनी केला. नक्षलवाद्यांना आता स्थानिकांचे सहकार्य मिळत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. एकच नाही तर अनेक नक्षलवादी आता आत्मसर्पण करत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.