जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२३
देशात अनेक दिवसापासून राजकीय नेत्यासह उद्योजकांवर ईडीचे धाडसत्र सुरू असतांना भ्रष्ट अधिकारी सध्या ईडीच्या रडारवर आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनेक ठिकाणी छापेमारी देखील करण्यात येत आहे. अशातच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने एका ईडी अधिकाऱ्याला २० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या दिंडीगुल येथे लाचलुचपत पथकाने ईडीला अधिकाऱ्याला लाच घेण्याच्या आरोपाखाली शुक्रवारी रात्री अटक केली आहे. दिंडीगुल-मदुराई महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करत ही कारवाई करण्यात आली आहे. अंकित तिवारी असं लाचखोर ईडी अधिकाऱ्याचं नाव आहे. तिवारी हा केंद्र सरकारच्या मदुराई अंमलबजावणी विभाग कार्यालयात ईडी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर डीव्हीएसीच्या अधिकाऱ्यांनी तिवारी याच्या घरावरही छापा टाकला आहे. अहवालानुसार, अटकेनंतर अंकित तिवारीला दिंडीगुल येथील कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिवारी हा २०१६ बॅचचा अधिकारी आहे. त्याने गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये काम केले आहे.
अंकित तिवारीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो पाच वर्षांहून अधिक काळ ईडीमध्ये काम करत आहे. तिवारी याने कारवाई टाळण्यासाठी एका डॉक्टरकडे ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २० लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्यानंतर तिवारी हा महाराष्ट्र नोंदणी क्रमांक असलेल्या कारमधून रोख रक्कम घेऊन जात होता. यावेळी दिंडीगुलजवळ त्याला लाचलुचपत पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिवारीने सुसाट गाडी चालवत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी पाठलाग करीत त्याला पकडले.