जळगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्तक म्हणून काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातकडे वळवणे हे हस्तकाचे काम नसते. तोच प्रकल्प परत आणल्यास महाराष्ट्र त्यांचा गौरव करेल, अशा शब्दात आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
राज्य सरकारने प्रतिष्ठा पणाला लावावी. हा राजकीय नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मीतेचा विषय आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येवून तो प्रकल्प महाराष्ट्रात राहण्यासाठी मोदी, शहा यांची भेट घेवून विनंती करावी, असे आवाहनही खडसे यांनी केले आहे. एका कार्यक्रमानिमित्त खडसे जळगाव येथे आलेले असताना खडसे यांनी पत्रकारांची संवाद साधला. 20 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री मुक्ताईनगर मतदार संघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा, वेदांता प्रकल्प तसेच साधूंवर झालेल्या हल्ल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची खडसे यांनी उत्तरे दिली. वेदांता प्रकल्प गुजरातकडे वळवण्यात आला, हा महाराष्ट्रावर एकप्रकारे अन्याय आहे. हा निर्णय दुर्देवी असल्याचे ते म्हणाले.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली असती. दरडोई उत्पन्नात 18 टक्क्यांनी वाढ झाली असती. राज्याचे जीडीपी वाढला असता. लाखो युवकांना रोजगार मिळाला असता. सर्व व्यवस्था अंतिम स्तराला आल्यानंतर हा प्रकल्प गुजरातकडे वळण्यात आला. हा राजकीय नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अजूनही नरेंद्र मोदी, अमित शहा यांना भेटून हा प्रकल्प महाराष्ट्रात राहावा, यासाठी विनंती करावी.
अजून वेळ गेलेली नाही. राज्य सरकारने प्रतिष्ठा पणाला लावावी. हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु होण्यासाठी प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांनी हिंदू गर्जना केली. त्या माध्यमातून ते येत आहेत, स्थानिक आमदाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. दौऱ्यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुक्ताईनगर व जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लागावेत.
मुक्ताई मंदिर विकासाचा 100 कोटींचा प्रकल्प तीन वर्षांपासून प्रलंबीत आहे. बोदवड उपसा सिंचन योजनेला वेग आला पाहिजेत. राजकीय कार्यक्रम उरकायचा असेल तर उरकवा. त्याबरोबरीने विकास कामांना मान्यता दिल्यास अधिक आनंद होईल. गैरसमजातून साधूंवर हल्ला झाला, ही बाब चुकीची आहे. या राज्यात साधू संतही सुरक्षित नाहीत. हे प्रकार टाळता येऊ शकतात. पालघरची पुनरावृत्ती झाली असती. खासदार रक्षा खडसेच्या वाहनाचे टायर फुटल्याने अपघात झाला. त्यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाहनामध्ये केवळ चालकच होता. चालक सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.