जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात होत असतांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर पहाटेच्या सुमारास गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. यामुळे टँकरमधून मोठी गॅसगळती सुरू झाली. काही क्षणातच परिसरात उग्र वास पसरला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले.
सध्या वायुगळती होत असलेल्या टँकरवर पाण्याचा मारा केला जात आहे. त्याचबरोबर कुठलीही घटना घडू नये म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्याचबरोबर जालना रोडवरील सिडको चौक ते हायकोर्ट सिग्नलपर्यंत वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घरातील घरगुती गॅस लाईट शेगडी हे बंद ठेवावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान गॅस गळती रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत वायुगळती आटोक्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातून जालना रोड गेला असल्याने शहरातील सिडको परिसरात नेहमी मोठी वर्दळ असते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास हॉटेल रामगिरीसमोर एचपी गॅस कंपनीचा गॅस वाहून नेणारा टँकर अनियंत्रित होऊन उलटला. क्षणार्धात टँकरमधून मोठी वायूगळती सुरू झाली. परिसरात उग्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले. टँकरमधून होणारी वायुगळती रोखण्यासाठी सद्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. तसेच परिसरातील वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला आहे.