जळगाव : प्रतिनिधी
वैद्यकीय उपचारासाठी गेल्यानंतर मद्यप्राशन करून कारागृहात रक्षकाला खून करण्याची धमकी देणाऱ्या चेतन आळंदे ऊर्फ चिंग्या याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असताना चिंग्याने मद्यप्राशन केल्याने पोलीसही अडचनित आले असून त्यांचीही चौकशी करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत.
वैद्यकीय उपचारासाठी आल्यावर चिंग्याने मद्यप्राशन केले होते. कारागृहात दाखल झाल्यावर त्याने तेथे धिंगाणा घालून रक्षकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी चिंग्याविरुद्ध शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या वादामुळे त्याला पोलीस बंदोबस्तात नाशिक कारागृहात हलविण्यात आल्याची माहिती कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन पाटील यांनी दिली. पोलिसांच्या ताब्यात असताना मद्यप्राशन केल्यामुळे ड्युटीवरील तिन्ही पोलिसांची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली चिंग्याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे.