जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना नियमित घडत असतना छत्रपती संभाजीनगरमधून देखील अशाच एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. शहरातील बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघा भाऊ- बहिणींचा जागीच मृत्यू झाला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेलसमोर ८, फेब्रुवारी भीषण अपघात झाला. दोन भरधाव हायवांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात एका दुचाकीला चिरडले. या दुर्घटनेत परीक्षेला जाणाऱ्या तिघे बहिण-भाऊ जागीच ठार झाले. या भयंकर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे आहेत. ते वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील होते. मृतांजवळ वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट सापडले. यावरून ते परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
अपघातातील मृत भाऊ- बहिण हे परभणी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत असून मागील काही दिवसांपासून ते सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलीस तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तिन्ही मृतदेह घाटीत पाठवले आहेत. दरम्यान, अपघातानंतर हायवा चालक फरार झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.