जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघात हिंगोलीमध्ये घडला आहे. या भीषण अपघातात संपूर्ण कुटूंब उध्वस्त झालं असून आई-वडिलांना दुचाकीवरुन रुग्णालयात घेऊन जाताना झालेल्या अपघातात मुलगा, आई-वडील असा तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिंगोलीच्या डिग्रस वाणी गावातील तिघांच्या मृत्यूने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी एका वळणावरून रस्त्याच्या शेजारील नाल्यात कोसळली आणि तिघेही दुचाकीसह नाल्यामध्ये पडले. मात्र या रस्त्यावरून रहदारी नसल्याने अपघाताची माहिती कुणालाच मिळाली नाही. त्यामुळे तिघांनाही रात्रभर मदत मिळाली नाही. गुरुवारी सकाळी दूध विक्रेते जात असताना हा अपघात झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनेची माहिती दिली.
या अपघातात कुंडलिक जाधव, कलावती जाधव व मुलगा आकाश जाधव यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आकाश बुधवारी रात्री आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची तब्येत बिघडल्याने मुलगा त्यांना रुग्णालयात घेऊन जात होता. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच दुचाकीचा अपघात झाला. रात्रीच्यावेळी अपघात झाल्याने घटना उघडकीस आली नाही. सकाळी अपघाताची घटना समोर आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तीनही जणांना या अपघातात मृत्यू झाला होता.