मुंबई : वृत्तसंस्था
मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेली राज ठाकरे यांची मनसे आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु होणार असून पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
आगामी निवडणुकांपूर्वी राज्यभर मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी मनसेनं नवं घोषवाक्य जाहीर केलं आहे. ‘मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक’ असं मनसेचं नवं घोषवाक्य असणार आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी या मोहिमेला सुरुवात होणार आहे. 2014 पासून मनसेच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागलाय. त्यानंतर मनसेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेतला. आता मनसेच्या नव्या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिंदुत्वाच्या मुद्याची जोड दिल्यानं मनसेची पुढची राजकीय भूमिका आता स्पष्ट झाली आहे.
शस्त्रक्रिया आणि विश्रांती अशा दोन महिन्याच्या कालावधीनंतर राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबईत दोन दिवस पदाधिकारी बैठक आणि मेळव्यानंतर आज ते पुण्यात असणार आहेत.पुण्यातून आज मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी शुभारंभाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.