जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२४
देशातील अनेक भागात तरुणीसह महिलावर अत्याचाराच्या घटनेत नेहमीच वाढ होत असतांना एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका २२ वर्षीय तरुणीचे भर रस्त्यातून तरुणांनी अपहरण केले. त्यानंतर धावत्या कारमध्येच तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर कारमधून तिला बाहेर ढकलून दिलं. अर्धनग्न अवस्थेत तरुणीने पोलीस ठाणे गाठलं. ही संतापजनक घटना उत्तराखंडमधील हल्दवानी जिल्ह्यातील हिरानगर परिसरात घडली.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात असून पुन्हा एकदा महिला सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुणी मुखानी पोलीस स्टेशन परिसरात राहते. रविवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ती एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. पालम शहराकडे जात असताना पीडितेने ई-रिक्षाने प्रवास केला. त्यानंतर ती सुशीला तिवारी हॉस्पिटल परिसरात भावाची वाट पाहत थांबली. बराच वेळ उलटूनही पीडितेने घरी आईला फोन करून भावाबाबत विचारपूस केली. आईने तिला तिथेच थांबण्यास सांगितले.
दरम्यान, पीडिता भावाची वाट पाहत उभी असताना, आरोपी कारमधून तिथे आले. त्यांनी भररस्त्यातून पीडितेचे अपहरण केले. इतकंच नाही, तर तिला जबरदस्ती दारू देखील पाजली. त्यानंतर चौघांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. जवळपास तीन तासानंतर आरोपींनी पीडितेला धावत्या कारमधून बाहेर फेकून दिलं. घटनेनंतर आरोपी फरार झाले. दरम्यान, पीडितेने जवळचे पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे दोन आरोपींना अटक केली असून उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे.