जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२४
देशातील लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक पक्षातील दिग्गज नेत्यासह पदाधिकारी भाजपात दाखल होत असल्याने पक्ष बळकट होत असल्याचे दिसत आहे. तामिळनाडूतील 15 हून अधिक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे. यामध्ये अनेक माजी आमदार, माजी खासदारांचा समावेश आहे. यातच आता दक्षिणेत भाजप आता स्वतःचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे.
तामिळनाडूतील 15 माजी आमदार आणि एक माजी खासदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. सोमवारी या नेत्यांनी नवी दिल्लीत पक्षाचे सदस्यत्व घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, यातील बहुतेक अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) आहेत. याआधी भाजप राज्यात एआयएडीएमकेसोबत मिळून निवडणूक लढवत होती.
दरम्यान, भाजप दक्षिणेत विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी एक सभाही घेतली. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर, 2014 लोकसभेच्या तुलनेत केरळमधील काही जागांवर भाजपची स्थिती 2019 मध्ये मजबूत झाली होती. मात्र या राज्यात पक्षाला लोकसभेची एकही जागा अद्याप जिंकता आलेली नाही. याआधी कर्नाटकात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. मात्र 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हातून पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर डिसेंबर 2023 मध्ये जाहीर झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपसाठी दिलासादायक बातमी घेऊन आले. पक्षाच्या जागांची संख्या 2018 मधील 1 वरून 2023 मध्ये 8 वर पोहोचली आहे.