मुंबई : वृत्तसंस्था
“राज साहेब ज्वलंत भाषण करण्याची क्षमता कुणातच नाही, त्यामुळे दसऱ्याला शिवतीर्थावर तुम्हीच मेळावा घ्या.” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सध्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरून वाद सुरू असून दोन्ही बाजूंनी परवानगी साठी अर्ज करण्यात आले आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवसेनेचाच होईल असं ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी दसरा मेळावा घेऊन मराठी माणसाला मार्गदर्शन करावे अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी दसऱ्यावा शिवतीर्थावर मेळावा घेण्याची मागणी केली आहे. सध्या दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे पण मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगतं ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
आदरणीय साहेब,सविनय जय महाराष्ट्र!
वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ ‘एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष श्रोते’ हा चमत्कार अवघ्या जगात कुठे पहायला मिळाला असेल तर तो इथेच, आपल्या शिवतीर्थावर! दसऱ्याच्या दिवशी मराठीजनांच्या रांगाच्या रांगा ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत शिवतीर्थावर येत आणि हिंदुहृदसम्राटांकडून मिळालेलं राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माचं ‘बाळकडू’- विचारांचं सोनं घेऊन घरी परतत.
दुर्दैवाने, वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वतःला हिंदुहृदसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालाच तिलांजली दिली. ज्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांवर प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले, त्याच राष्ट्रद्रोही- धर्मद्रोही पक्षांशी आघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! बरं, इतकं सगळं करूनही स्वत:चा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आलं नाहीच.
एरवी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं असतं. पण आता “कै. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार” असं म्हणत ‘यू टर्न’ आणि ‘बंडखोर’ असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगतं ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही! ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा-मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?