
जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५
जगभरात मोठ्या उत्साहात अनेकांनी नवीन वर्षाचे जंगी स्वागत केले आहे. देशात गेल्या काही महिन्यापासून पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घसरण दिसली आहे. घरगुती गॅसच्या आघाडीवर ग्राहकांना अगोदरच दिलासा मिळालेला आहे. गेल्यावर्षी मार्च 2024 मध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत घसरण झाली होती. आता व्यावसायिक गॅसच्या किंमतीत मोठी घसरण आली आहे.
14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत एप्रिल महिन्यापासून स्थिर आहेत.400 रुपयांचा गॅस मोदी सरकारच्या काळात तिप्पट झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर 9 मार्च 2024 रोजी घरगुती गॅसच्या किंमतीत कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 1100 रुपयांहून गॅस दर खाली घसरले. आता दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 803 रुपये, कोलकत्त्यात 829 रुपये, मुंबईत हा दर 802.50 रुपये, तर चेन्नईत घरगुती गॅसची किंमत 818.50 रुपये आहे. उज्ज्वला सिलेंडर योजनेतील ग्राहकांना सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्यात येते.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. जुलै महिन्यापासून हे दाम चढेच होते. गेल्या जवळपास 6 महिन्यानंतर घसरण दिसली. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 14.5 रुपयांची घसरण झाली. येथे गॅस किंमत 1,804 रुपये झाली. तर कोलकत्तामध्ये 16 रुपयांच्या घसरणीसह भाव 1,911 रुपये झाले. मुंबईत 15 रुपयांच्या घसरणीसह भाव 1,756 रुपयांवर आले. चेन्नईत 14.5 रुपये घसरणीसह 1,966 रुपये झाले आहेत.