मुंबई : वृत्तसंस्था
मनी लाँड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अंतरिम वैद्यकीय जामीनाची मुदत २ आठवड्यांनी वाढवली आहे. ईडीच्या वकिलांना या प्रकरणात नवीन काही सूचना न मिळाल्याने, न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी २ आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. यामुळे मलिकांचा अंतरिम जामीन २ आठवडे कायम राहणार आहे. नवाब मलिक ऑगस्ट २०२३ पासून अंतरिम वैद्यकीय जामीनावर आहेत.
मलिक यांच्या जामीनाचा आज शेवटचा दिवस होता. आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर आज न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंड मालमत्ता खरेदी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. ते अद्याप जामीनावर बाहेर आहेत.
मनी लॉड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मलिक यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. मलिक यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
काय आहे आरोप?
दाऊद इब्राहिमच्या बहिणीला कुर्ला येथे मालमत्ता बळकावण्यासाठी मदत करणे आणि नंतर ती खरेदी करणे या आरोपाखाली मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. यातील पैसा हवालामार्फत टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे.