जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२४
सहलीसाठी रायगडमध्ये आलेल्या नाशिक भोसला मिलिटरी स्कूलच्या २८ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नाशिक भोसला मिलिटरी स्कूलचे कर्मचारी व १०३ विद्यार्थी सहलीसाठी रायगडात आले होते. किल्ले रायगड येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर ते ३० जानेवारी रोजी सायंकाळी किल्ले प्रतापगडकडे निघाले. रात्री पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव – मोरे सभागृहात त्यांनी वस्ती केली. तेथेच त्यांनी रात्रीचे जेवण उरकले. त्यानंतर १०३ पैकी २८ विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब, थंडी ताप यांसारखे त्रास सुरू झाले. त्यामुळे त्यांना बुधवारी सकाळी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील, डॉ. वाघतकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. युवराज म्हसकर व सहकाऱ्यांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात धाव घेत घटनेची माहिती घेतली. दरम्यान, या विद्यार्थ्यांनी शीतपेयांचे सेवन व अति प्रवास केल्याने त्यांना हा त्रास झाल्याचे या शाळेच्या सहलीचे समन्वयक संतोष जगताप यांनी सांगितले. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे स्पष्ट झाले नसून बाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या उलटीचे तसेच शौचाचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलादपूर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी १०३ पैकी ७५ विद्यार्थ्यांसह काही कर्मचारी पुढील सहलीसाठी रवाना झाले असून २८ विद्याथ्यांना बुधवारी दुपारी १ वाजता ग्रामीण रुग्णालयामधून सोडले असून पुढील एक तास त्यांना कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले.