जळगाव मिरर | १२ मार्च २०२४
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार मध्ये दाखल झाली आहे. मात्र, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येताच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारचे माजी पालकमंत्री तथा माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. पद्माकर वळवी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली असून उद्या बावनकुळे यांच्या उपस्थितीत वळवी यांचा अधिकृत भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. त्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा देखील सुरू केली आहे. या यात्रेचा सुरुवात मणिपूर येथून झाली असून यात्रेचा समारोप हा मुंबईत होणार आहे. या यात्रेच्या समारोपासाठी महाराष्ट्रात दाखल झालेले राहुल गांधी यांना पहिल्या दिवशी हा मोठा झटका मानला जात आहे. पद्माकर वळवी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रस्थ असलेले नाव आहे. मात्र, आता त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी नंदुरबार मध्ये दाखल होतात त्यांचा हा निर्णय समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.