जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघात जामनेर तालुक्यात घडला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वर मादणी गावाजवळील डॉ. किशोर दत्तात्रय पाटील यांच्या शेताजवळ फत्तेपूर येथून जळगावला निघालेल्या इको गाडीची जामनेर येथून फत्तेपूर कडे येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भिषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार ठार झाले तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दुचाकीवरील जामनेर तालुक्यातील कोदोली येथील सौरव कैलास कोळी हा जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेला शुभम दिनकर जाधव (रा. शिंगाईत, ता. जामनेर ) हा गंभीर जखमी झाला होता. त्याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर इको गाडीचा चालक मंगेश संतोष कोळी तसेच प्रवासी असलेले निवृत मुख्याध्यापक चंद्रकांत लक्ष्मण जैन व त्यांची पत्नी प्रमिलाबाई जैन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.
हा अपघात इतका भिषण होता की, इको गाडी (एमएच – १९ ईए- २७७९) व विना क्रमांकाची बीएमडब्ल्यू या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघात स्थळी मादणी व फत्तेपूर येथील ग्रामस्थांसह पोलिसांनी धाव घेतली व जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवले. तर मृत सौरव कोळी यास जी. एम. फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेतून चालक जालमसिंग यांनी जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले. या घटनेचा तपास पोनि सचिन सानप यांच्या मार्गदर्शनात हेड कॉ. किरण शिपी, प्रवीण चौधरी, दिनेश मारवडकर, पो.कॉ. गनी तडवी, अरुण पाटील, राहुल जोहरे, मुकेश पाटील करत आहेत.