जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३
पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील तलावात ३ ऑक्टोंबरला ४ वाजेच्या सुमारास एका ३५ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील रहिवासी रवींद्र पाटील (वय ३५) हा पुणे येथे लिफ्टचे काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या दोन वर्षापासून तो गावात आलेला होता. दरम्यान, पुन्हा पुणे येथे कामास जातो असे सांगून बॅग भरून रवींद्र पाटील हा २ ते ३ दिवसांपासून घरातून निघालेला होता. मात्र, तो पुणे येथे पोहोचलाच नाही. उलट गावालगत असलेल्या स्मशानभूमीच्या मागच्या बाजूला पाण्याच्या तलावात बुडालेल्या अवस्थेत त्याचा ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रवींद्र पाटील यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत रवींद्र पाटील यांच्या पश्चात्य पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.