
जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड शरण आल्यानंतर विरोधकांनी मंत्री मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली असतांना नुकतेच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील मोठी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके म्हणाले कि, वाल्मीक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असून या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील बोललो असल्याचे सोळंके यांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मीक कराडचा हात असल्याचा आरोप होत आहे. वाल्मीक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा जवळचा व्यक्ती असल्याचे म्हणत विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही हीच मागणी लावून धरली आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री आणि अजित पवारांकडेही चर्चा केल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
वाल्मीक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. बीड प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपीला शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरून दूर व्हावे. नाहीतर पक्षश्रेष्ठींनी त्यांना काढावे. तपास निपक्षपातीपणाने होईल अशी जनतेला हमी द्यावी, अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काही हालचाली सुरू असल्याची मला माहिती नाही. मी त्यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी केली आहे. मी त्या मागणीवर ठाम आहे. मुख्यमंत्री आणि अजितदादांना भेटून आम्ही हीच मागणी केली होती. त्याबाबतच्या निर्णय हा पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहे. प्रकाश सोळंके म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येला 24 दिवस उलटले. सर्व तपास यंत्रणा कामाला लावून सुद्धा अजुनही आरोपी मिळून आलेले नाहीत, हे तपास यंत्रणांचे अपयश आहे. अद्यापही आरोपींना अटक होत नाही, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाविषयी आक्रोश आहे. या आरोपींना कुणाचा तरी वरदहस्त, मोठ्या प्रमाणात पैसा असल्यामुळे आरोपींना फरार राहण्यास मदत मिळत असल्याचा दावा प्रकाश सोळंके यांनी केला.