जळगाव मिरर / १२ एप्रिल २०२३ ।
जळगाव जिल्ह्याची शान असलेले ज्येष्ठ वकील ऍड. उज्ज्वल निकम हे नेहमीच आपल्या कोर्टाच्या वेगवेगळ्या केसेसमुळे प्रसिद्ध आहेत. अशातच ते एका मराठी वाहिनीवर मोठी भूमिका बजाविणार आहे. त्यामुळे आपण त्यांना या भूमिकेत पाहू शकणार आहे.
झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका लोकप्रिय आहे. लवकरच या मालिकेत दोन दिग्गजांची एंट्री होणार आहे. ज्येष्ठ वकील ऍड. उज्ज्वल निकम आणि लेखक—आयएएस अधिकारी विश्वास पाटील ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत झळकणार आहेत. ते अप्पीची मुलाखत घेताना दिसतील.
अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी. ही ती मुलगी जी खेडेगावात राहते, तिथे शैक्षणिक सुविधा नाहीत, तिला कुठले मार्गदर्शन नाही, पण तिचे ध्येय खूप मोठे आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करून ती कलेक्टर होते. अप्पीने नुकतीच यूपीएससीची परीक्षा पहिल्या नंबरने पास केली आहे आणि आता तिचे कलेक्टर बनण्याचे स्वप्न दृष्टिपथात येणार आहे. पण यासाठी तिला अजून एका परीक्षेमधून जावे लागणार आहे ते म्हणजे ऍड. उज्ज्वल निकम आणि आयएएस अधिकारी विश्वास पाटील तिची मुलाखत घेणार आहेत. अप्पी कलेक्टर बनण्याचा अखेरचा कठीण टप्पा पार करेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.