जळगाव, : प्रतिनिधी
मंत्रीपद हे मिरवण्याचे नव्हे तर काम करण्याचे साधन आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी याचा गावाच्या विकासासाठी लाभ करून घ्यावा असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील खापरखेडा-नांद्रा खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ६० लाख रूपयांच्या कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी विरोधकांवर टीका करतांना गेल्या ७ वर्षात ज्यांनी कधी लोकांचे तोंड पाहिले नाही, ते आता गावोगावी भेट देऊन लोकांचे हितकर्ते असल्याचा आव आणत आहेत. तथापि, जनता सुज्ञ व हुशार असल्याचे सांगत त्यांनी सूचक टीका केली. तर, वासुभाऊ सोनवणे, प्रल्हाद पाटील आणि त्यांच्या सहकार्यांची गावाप्रती असणारी निष्ठा व धडपड ही अतिशय कौतुकास्पद असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
जळगाव तालुक्यातील खापरखेडा-नांद्रा खुर्द येथे आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ६० लाख रूपयांच्या कामांचे भूमीपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे माजी सभापती जनाआप्पा पाटील, मुकेश सोनवणे लकी टेलर, मिलिंद चौधरी , पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता एस पी लोखंडे , पी.आय. रामकृष्ण कुंभार, पी.एस.आय एस. जे. वाणी, अशोक गुड्डू सपकाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंत अण्णा पाटील, वसंता सपकाळे, जय बजरंग व्यायाम शाळेचे पदाधिकारी तसेच अशोकआप्पा सोनवणे, नारायण आप्पा सोनवणे, सरपंच सुरेखाताई सोनवणे, उपसरपंच सविताताई सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सोनवणे, मनीषा पाटील, मनीषा सपकाळे, रघुनाथ महाजन, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदाधिकारी, दिलीप जगताप , शिवाजी पाटील , यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते नांद्रा खुर्द , खापरखेडा, सावखेडा देऊळवाडा, भादली, भोलाणे, धामणगाव परिसरातील सरपंच पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले की, ना.गुलाबराव पाटील हे कार्यकर्त्यांना जीवाला जीव देणारे आहे. गुलाब भाऊ हे दूरदृष्टीचे नेते असून त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वासुदेव सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात वासुदेव सोनवणे यांनी गावाला नवीन ३८ लाखाची पाणीपुरवठा योजना व विविध विकास कामांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानून गावाची सद्यस्थिती विशद केली. तर आभार प्रदर्शन माजी सरपंच प्रल्हाद पाटील यांनी मानले.
या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण !
नांद्रा खुर्द येथे ३८ लाख रुपये निधीतून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून यासाठी गावांतर्गत पाईपलाईन, पाण्याचा स्रोत ते गावाच्या पाणी टाकीपर्यंत मोठी पाईपलाईन , जलकुंभ या कामांचा समावेश आहे. या ३८ लक्ष कामाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला. त्यासोबतच खापरखेडा येथे ९ लक्ष निधी खर्च करून गाव अंतर्गत रस्त्यावर व चौकात बसविण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉकचे लोकार्पण करण्यात आले असून नांद्रा खुर्द येथील हनुमान मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधकाम (१० लक्ष), गावअंतर्गत कॉंक्रिटीकरण (३ लक्ष), अशा ६० लाखांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
चिमुकल्यांचा वाढदिवस साजरा
या कार्यक्रमाला चि. हिमांशू आणि चि. गुरूनाथ यांची उपस्थिती होती. त्यांचा वाढदिवस असल्याची माहिती मिळताच गुलाबभाऊंनी तातडीने केक आणायला सांगून त्यांचा वाढदिवस साजरा केला. इतक्या मोठ्या कार्यक्रमात वाढदिवस साजरा झाल्याने दोन्ही चिमुकले भारावून गेल्याचे दिसून आले.
*वासुदेव सोनवणे, प्रल्हाद पाटील व सहकार्यांचे कौतुक
ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी वासुदेव सोनवणे, प्रल्हाद पाटील आणि त्यांचे सहकारी गावाच्या विकासासाठी खूप धडपडत असून त्यांची कामासाठी असणारी ही निष्ठा अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले. इतर गावातील पदाधिकार्यांनी याचा आदर्श घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.