जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२४
पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथे २५ वर्षीय तरुणास सर्पदंशल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देशमुखवाडीतील रहिवासी निखिल चंद्रकांत पाटील (वय २५) हे दुपारच्या सुमारास लघुशंकेसाठी जात असताना त्यास सर्पदंश झाला. निखिल यास तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन निखिल यास मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन निकम करत आहेत. निखिल यांच्या पश्चात्य आई, वडील, भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे. निखिल यांच्या अकस्मात मृत्यूने देशमुखवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.