
जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२४
परभणी जिल्ह्यातील वडळी याठिकाणी आई कामात व्यग्र असताना खेळणाऱ्या दीड वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. कानिफनाथ शिवाजी मिरास असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील वडळी (ता. जिंतूर) येथील शिवाजी मिरास हे पत्नी व दीड वर्षाच्या मुलासह तीन महिन्यांपासून अंबालिका सहकारी साखर राशिन येथे ऊसतोडी करत आहेत. ते आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील थेटेवस्तीवर झोपड्या टाकून वास्तव्यास आहेत. ते सकाळी नेहमीप्रमाणे उसाच्या फडात जाण्यासाठी कामाची आवराआवर करत होते. यावेळी त्यांचा चिमुकला शेजारी खेळत होता. आई कामात असताना चिमुकला बादलीला धरून उभा होता. खेळताना तोल गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. काम आवरल्यानंतर आईने आजूबाजूला शोधले असता तो बादलीत बुडाल्याचे दिसून आले.






















