
जळगाव मिरर | १ जुलै २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाळा सुरु झाल्यावर अनेक नागरिक पर्यटन करण्यासाठी विविध ठिकाणी जात असतात, मात्र पर्यटन ठिकाणावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील चार मुले व एक महिला असे पाचजण वाहून गेले. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नूर शाहिस्ता अन्सारी (३५), अमिना आदिल अन्सारी (१३), मारिया अन्सारी (७), हुमेदा अन्सारी (६), अदनान अन्सारी (४, सर्व रा. हडपसर, पुणे) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. अन्सारी परिवारातील १५ जण वर्षाविहारासाठी आले होते. धरणाच्या पूर्वेकडील प्रवाहात मुले खेळत होती. पावसाचा जोर जास्त असल्याने प्रवाहातील पाण्याचा वेग वाढत होता. मुलांना त्याचा अंदाज आला नाही. मुले प्रवाहात वाहून गेली. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करताना नूर अन्सारी याही वाहून गेल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना वाचविणे इतरांना शक्य झाले नाही.






















