
जळगाव मिरर | ५ जुलै २०२४
राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येणाऱ्या विरूळ रोंघे गावात दोन सख्या चुलत बहिणींचा शुक्रवारी दि.५ पहाटे अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. नंदिनी प्रवीण साव ( वय १०) व चैताली राजेंद्र साव (वय ११) असे मृत्यू झालेल्या दोन्ही सख्ख्या चुलत बहिणीचे नाव आहे. तर याच कुटुंबातील चार वर्षीय देवेंद्र राजेंद्र साव याच्यावर देखील उपचार सुरू आहेत.
चैताली ही पाचव्या वर्गात शिकत होती तर नंदिनी ही इयत्ता चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी होती. गुरुवारी दुपारी दोन्ही चुलत बहिणी एकत्र खेळत होत्या. मात्र अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागले. ताप व अतिसाराची लक्षणे असल्यामुळे त्यांना धामणगाव रेल्वे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार करून दोघींनाही घरी आणण्यात आले. मात्र अचानक रात्री दोघींची ही प्रकृती बिघडली आणि आज पहाटे नंदिनी व चैताली हिचा काही अंतराच्या फरकाने एकाच वेळी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या चुलत बहिणी दगावल्यामुळे आणि त्याच कुटुंबातील अन्य एका चिमुकल्यावर उपचार सुरू असल्याने या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान घटनेनंतर आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.






















