अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाच चोरट्यांनी गंडवल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत घडली. यात मुलांना पैसे पाठवण्यासाठी भरणा करायला गेलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे एक लाख रुपये चोरट्यानी लांबवून नेल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अर्जुन आत्माराम बोरसे यांना सेवनिवृत्तीची रक्कम मिळाली होती. त्यातून त्यांनी पत्न ीला दागिने घेतले होते. मात्र, मुलगा आणि मुलगी यांना पैसे पाठवायचे असल्याने त्यांनी दागिने मोडून मिळालेली १ लाख ४५ हजार रुपये रक्कम ११ रोजी दुपारी १२ वाजता पिशवीत घेऊन ते स्टेट बँकेत भरणा करायला गेले होते. सुरुवातीला मुलीच्या खात्यावर ४५ हजार रुपये भरले आणि तेव्हढ्यात तेथे जवळच असलेल्या चोरट्यांनी १ लाख रुपयांची पिशवी लांबवली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, दीपक माळी, रवी पाटील, गणेश पाटील, निलेश मोरे यांनी भेट देऊन बँक व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच चोरट्यांचा आजूबाजूला शोध घेतला.