जळगाव मिरर | ३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील प्रत्येक गावात सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची चर्चा रंगत आहे तर एका हॉटेल व्यावसायिकांने चक्क मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून ‘मनोज’ नावाच्या व्यक्तीला पोटभर जेवण व ते देखील मोफत देण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे या उपक्रमाची देखील चर्चा जोर धरू लागली आहे.
आपल्याकडूनही मनोज जरांगे यांना त्यांना समर्थन मिळावं असा विचार मनात घेऊन मनोज नावाच्या नागरिकांना मोफत जेवन दिलं जात आहे. बाळासाहेब भोजने असं हॉटेल मालकाचं नाव असून त्यांनी जरांगे यांचे नाव ‘मनोज’ असल्याने त्यांच्या नावकऱ्यांना मोफत जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी येत असताना मनोज नावाच्या व्यक्तीने स्वतःचे आधार कार्ड सोबत घेऊन यावे, अशी अट ठेवली आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी चक्क एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. भोजने यांनी ‘मनोज’ नावाच्या व्यक्तीला त्याने आधार कार्ड दाखवून २३ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जात होते. त्यात वाढ करून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले जाणार आहे.