जळगाव मिरर | ११ मार्च २०२४
किराणा साहित्य घेऊन शिरसोली येथे घरी परतत असताना दुचाकी विद्युत डीपीवर धडकली. या अपघातात कबीर भिका चव्हाण (वय ४४, रा. शिरसोली प्र.न., ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावरील नेहरु नगर परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे कबीर चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. जैन व्हॅली कंपनीमध्ये कामाला होते रविवार असल्याने कबीर चव्हाण हे जळगावहून किराणा साहित्य घेऊन (एमएच १९ सीएम ९१५१) क्रमांकाच्या दुचाकीने शिरसोली येथे घरी जाण्यासाठी निघाले होते.
शिरसोली रस्त्यावरील नेहरु नगर परिसरात त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या डीपीवर जावून धडकली. या अपघातात कबीर यांना गंभीर दुखापत झाली होती. दुचाकीस्वार डीपीवर आदळून गंभीर जखमी झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. या ठिकाणी कुटुंबीयांनी आक्रोश केला. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.