जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२४
धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील महिलेचे गेल्या पाच दिवसापासून दीड वर्षाच्या लहान बाळ व परिवारासह जळगाव जिल्हा परिषदेबाहेर उपोषण सुरु आहे. भाड्याच्या घरात राहते म्हणून अंगणवाडी सेविका भरतीत अपात्र ठरविण्यात आल्याने हे उपोषण सुरू असून जिल्हा परिषद प्रशासनाकडून विभागीय कार्यालयाकडे दाद मागण्याचा सल्लाही या महिलेस देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनवद येथील दिपाली विशाल ठाकणे या अंगणवाडी सेविका पदासाठी गुणत्तेनुसार पहिल्या यादीत पात्र ठरल्या होत्या. मात्र त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यावर जि.प. प्रशासक व सीईओंनी सुनावणी घेऊन ग्रामपंचायतींच्या ठरावान्वये या महिलेस अपात्र ठरविले. मात्र शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे या भरतीसाठीच्या गुणवत्तेनुसार आणि स्थानिक रहिवास हा गावातील असावा यानुसार आपण पात्र असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.
त्याअनुषंगाने रहिवासाचे परिपूर्ण दाखले व शैक्षणिक अर्हता असतानाही सीडीपीओ धनगर याच्या मध्यस्थीने सोनवदचे ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांनी खोटे दस्ताऐवज तयार करून मला अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप या महिलेने निवेदनात केला आहे. तसेच सीडीपीओ यांनी पदाच्या नियुक्तीसाठी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. गेल्या पाच दिवसापासून एक वर्षांच्या बाळासह ही महिला जि.प. समोर उपोषणास बसली आहे. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या कुटुंबियांना भेट देण्याची साधी तसदीही घेतलेली नाही.