जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील एका चटई कंपनीत काम करीत असतांना मशिनचे ब्लेड तुटून छातीत घुसल्याने २६ वर्षीय कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका चटई कंपनीत भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील गिरीश रविंद्र वायकोळे (वय २६) हा तरुण कामाला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास मशिनवर काम करतांना अचानक मशिनमधील ब्लेड तुटून ते थेट गिरीश वायकोळे याच्या छातील घुसले. यामुळे तो गंभीर जखमी झाल्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्यांनी त्याला लागलीच खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकों गफ्फार तडवी हे करीत आहे.