अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असून नुकतेच अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी वाढल्याने महसूलच्या पथकाने विविध भागात कारवाई करत शहरात अवैध वाळू वाहतूक करणारे ६ टेम्पो पकडले असून अमळनेर पोलिसांत चालक-मालकासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांनी चार पथक तयार करत दि. ९ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अमळनेर शहरात छापे टाकत अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करणारे ६ टेम्पो पकडण्यात आले. सर्व टेम्पो व वाळू असा १ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या पथकात मंडळ अधिकारी गौरव शिरसाठ एन. डी. धनराले, वाय. आर. पाटील, व्ही. पी. पाटील, तलाठी स्वप्नील कुळकर्णी, पराग पाटील, वाल्मीक पाटील, बळीराम काळे, सतीश शिंदे, प्रदीप भदाणे, महेश अहिरराव, ए. बी. सोनवणे, तिलेश पवार, प्रमोद माळी, महेंद्र पाटील, आय. एस. महाजन यांचा समावेश होता.