मुंबई : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. एक अनोळखी व्यक्ती अमित शाहांच्या जवळ फिरत होता. महत्वाची बाब म्हणजे संबंधित व्यक्तीनं आपण आंध्रप्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचं सुरक्षारक्षकांना भासवलं आणि बराच वेळ तो अमित शाहांच्या अवती-भोवती फिरत होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
हेमंत पवार नावाचा हा व्यक्ती आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याचे भासवत होता. शहा यांच्या मुंबई दौऱ्यात हेमंत पवार या व्यक्तीने अधिकारी असल्याचे भासवून अमित शहा यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या आरोपात पोलिसांनी (Police) हेमंत पवार याला भादंवि कलम १७० आणि कलम १७१ अन्वये अटक केली आहे. झेड प्लस सुरक्षा असूनही अमित शहा यांच्या जवळ एखादी अनोळखी व्यक्ती कशी काय गेली? कित्येक तास या व्यक्तीला कोणीच का हटकले नाही?, असे प्रश्न निर्माण झाले आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीनंतर या व्यक्तीला अटक केली आहे. हेमंत पवार असे आरोपीचे नाव असून तो धुळ्याचा रहिवासी आहे. त्याने गळ्यात गृहमंत्रालयाचे ओळखपत्रही घातले होते. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या घराबाहेर ब्लेझर घालून फिरताना दिसला. हा व्यक्ती अमित शहांच्या अवतीभोवती का फिरत होता? त्याचा हेतू काय होता? याबाबत अद्याप पोलिसांनी माहिती दिली नाही. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत त्या व्यक्तीला अटक केली आणि गिरगाव कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं संबंधित व्यक्तीला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.