
जळगाव मिरर | १७ जून २०२४
बाजारामध्ये खरेदीसाठी येऊन दुचाकी लावत असताना तोल जाऊन खाली पडल्याने राजेश शिवाजी पाटील (वय ५०, रा. हिराशिवा कॉलनी, खोटे नगर) यांचा १५ जून रोजी मृत्यू झाला. ही घटना दादावाडी जवळील बोगद्याखाली घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगर परिसरातील हिराशिवा कॉलनीत राजेश पाटील हे वास्तव्यास होते. बुधवार दि. १२ जून रोजी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी ते दादावाडी येथील बोगद्याजवळ दुचाकी उभी करत असताना त्यांचा तोल जावून ते जमिनीवर पडले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारा सुरू असताना शनिवार दि. १५ जून रोजी मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आहेत.





















