जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२३
राज्यातील शिक्षण झालेल्या तरुणांना नोकरीची एक मोठी संधी उपलब्ध झाली असून सरकारने राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांसाठी मेगाभरती केली जात आहे. तब्बल ७१७ रिक्त जागांकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार रात्री ११.५५ वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार आहेत. उत्पादन शुल्क
विभागातील लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान, वाहनचालक आणि चपराशी या पदांच्या एकूण ७१७ रिक्त जागांसाठी १७ नोव्हेंबर २०२३ पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अवकाळी पाऊस, गारपिटीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधा खंडित झाली होती. त्यामुळे या भरती प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. त्याची दखल घेत ही मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे.