जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला युवा उद्योजक अविनाश पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांना युवा उद्योजक तथा विजया केसरी प्रतिष्ठानचे संचालक अविनाश पाटील यांच्याहस्ते श्रीराम मंदिर प्रतिमा भेट देण्यात आली.
दरम्यान, जिल्हा बँकेची वाटचाल, जिल्हा तसेच युवा उद्योजक व्यावसायिकांना व्यवसाय संधी, उद्योग व्यवसाय उभारणी, भांडवल अर्थपुरवठा, देण्यात येणाऱ्या सुविधा, सवलती, अडीअडचणीचे निवारण, मार्गदर्शन या माध्यमातून स्वयं रोजगार, सुशिक्षित नवयुवकाना रोजगार उपलब्धता आदी संदर्भात चर्चा करण्यात आली.
सर्वसामान्यांची विशेषतः शेतकऱ्यांची बँक- जितेंद्र देशमुख
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यंतर्गत १५ तालुकास्तरावर तसेच ग्रामीण भागात जिल्हा बँकेच्या सुमारे २५५ शाखा असून जिल्हा सहकारी बँक ही सर्वसामान्यांची विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची बँक आहे. जिल्हा बँकेच्या अंतर्गत ग्रामीण भागात सुमारे ८५६ विविध विकास कार्यकारी सोसायट्या असून स्थानिक स्तरावर सुमारे तीन ते चार लाखांच्यावर शेतकरी सभासद आहेत. त्यात स्थानिक विकास सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना अल्प व मध्यम मुदतीचे पीक कर्ज, शेतीसंदर्भात औजारे, ट्रॅक्टर तसेच अन्य उपयोगी साहित्य खरेदी साठी कर्ज पुरवठा केला जातो. स्थानिक स्तरावरील विकासो मार्फत पीक कर्जधारक शेतकरी सभासद त्या आर्थिक वर्षांतर्गत वेळेवर मुदतीच्या आत कर्ज परतफेड करतात. अशा शेतकऱ्याना शासनाच्या नियम, धोरणानुसार सवलतीचा तसेच वेळोवेळी जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन योजनांचा लाभ, पीक विमा, पी एम किसान योजना लाभ देण्यात आला आहे. याशिवाय नैसर्गिक अवर्षण, बेमोसमी पाऊस यामुळे शासन स्तरावरून शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात आलेली मदत, अनुदान, अर्थसहाय्य डीबीटीद्वारे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जात असल्याची माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांनी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे प्रशासन व कर्ज वसुली विभाग व्यवस्थापक मंगल सोनवणे, व्यवस्थापक अतुल तोंडापुरकर, सुनील पवार, आर.आर.पाटील यांचेसह अन्य अधिकारी उपस्थित होते