अमळनेर : विक्की उत्तम जाधव
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने २९ जानेवारीपासून संमेलनपूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात कथ्थक नृत्य, तबला वादन, भरतनाट्यम् आदी कार्यक्रम प्रताप महाविद्यालयातील राणे सभागृहात दररोज दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान होतील.
दि.२९ रोजी आर्या शेंदुर्णीकर कथ्थक नृत्य, तेजल जगताप एकल तबला वादन तर सुनिल वाघ व त्यांचे सहकारी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम सादर करतील. दि. ३० रोजी नयना कुलकर्णी आणि समूह ‘आमची माती आमची संस्कृती’, अमळनेर महिला मंच ‘सूर तेच छेडीता’ तर कानुश्री संगीत विद्यालय, धुळे येथील चमू भरतनाट्यम् सादर करतील. दि. ३१ रोजी मुद्रा स्कूल ऑफ भरतनाट्यम्, जळगाव येथील नेहा जोशी यांचा शिष्य परिवार भरतनाट्यम् सादर करतील. यज्ञेश जेऊरकर एकल तबला वादन तर स्वरांजली, अमळनेरचा चमू ‘अशी पाखरे येती’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करतील.
दि. १ फेब्रुवारीला बालमेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बालमेळाव्याचे अध्यक्षस्थान तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगांवचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख भुषविणार आहे. बाल मेळाव्याचे उद्घाटन रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थीनी पियुषा गिरीष जाधव हिच्या हस्ते होईल. तर बाल स्वागताध्यक्ष पद डि.आर.कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थीनी दिक्षा राजरत्न सरदार भुषविणार आहे. बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदि कलाविष्कार सादर करणार असल्याची माहिती सांस्कृतिक समिती व बालमेळावा प्रमुख संदीप घोरपडे, भैय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे यांनी दिली.