जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२४
तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात मंगळवारी बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय नातवासह ५० वर्षीय आजीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असून आठवड्याभरात बिबट्याच्या हल्यात तीन मृत्यू झाले असून यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. साखराबाई खेमा तडवी (वय ५०) व श्रावण शिवाज्या तडवी अशी मृत आजी व नाताचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तळोदा काजीपूर (ता. तळोदा) शिवारात अतुल सूर्यवंशी यांच्या शेतात भगदरी येथील कुटुंब रखवालदार म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे साखराबाई खेमा तडवी (वय ५०) या मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. बराच उशीर झाला मात्र आजी घराकडे परतली नसल्याचे पाहून त्यांची मुलगी व श्रावण हे साखराबाई यांच्या शोधात शेताकडे निघाले. शेताकडे येताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रावणवर हल्ला चढवला व त्याला ओढून बाजूच्या उसाच्या शेतात नेले.
ही घटना पाहून ग्रामस्थांनी आरडाओरड केला. मुलाला बिबट्या घेऊन गेल्यानंतर पुन्हा आजी साखराबाईचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेहच आढळला. बिबट्याने साखराबाईचे मानेपासून वरचे डोके व छातीचा अर्धा भाग खाऊन नष्ट केला होता. साखराबाईवर बिबट्याने दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान हल्ला केला असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे श्रावणला वाचवण्यातही यश आले नाही. त्याच्या मानेवर व डोक्यावर बिबट्याच्या हल्ल्यात खोलवर जखमा झाल्याने रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा मृत्यू झाला.