मुंबई : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचे गृह विभाग लवकरच सात हजार पोलिसांच्या भरतीचे आदेश देणार आहे . विधानसभेत लक्षवेधी प्रस्तावावर फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलिस खात्यात मनुष्यबळाची उणीव भासत आहे. मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे.
भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील अवैध धंद्यांबाबत लक्षवेधी सूचना मांडली. नवी मुंबई परिसरात सुरू झालेल्या अवैध धंद्याची चौकशी करून वरिष्ठ अधिकारी दोषी आढळल्यास त्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. कोणत्याही शहरातील कोणताही अधिकारी एकाच पदावर जास्त काळ राहू नये, याचीही काळजी घेतली जाणार असल्याचे समोर आले. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे.
उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत मटका, जुगार, लॉटरी, गोमांस तस्करी, अवैध दारू विक्री, डिझेल चोरी, बायो डिझेल चोरी, निर्धारित वेळेपेक्षा पब उघडणे, मसाज पार्लरच्या नावाने वेश्याव्यवसाय संदर्भात 2021 मध्ये 463 गुन्हे दाखल झाले असून 1277 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2022 मध्ये एकूण 231 गुन्ह्यांची नोंद झाली असून 700 आरोपींना अटक करण्यात आली आहे.